टाकळी हाजी पोलिस चौकीतील कारवाईने खळबळ; ‘लक्ष्मी’च्या व्यवहारांचीही चौकशी होणार का?
शिरूर (वृत्तसेवा) : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकीवर लाचखोरीचे डाग लागल्याने शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. टाकळी हाजी पोलिस चौकीशी संबंधित दोन स्वतंत्र लाचखोरीच्या प्रकरणांत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन पोलिस हवालदारांवर कारवाई केली आहे. एका हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्याने तब्बल ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर एसीबीची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.
या सलग कारवायांमुळे ‘टाकळी हाजी पोलिस चौकीत नेमके चालले तरी काय?’ असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
९५ हजारांची ‘डील’; एसीबीची चाहूल लागताच पलायन
एसीबीच्या माहितीनुसार, सतीश नाथाराव मुंढे (वय ४५) यांच्याकडे एका गुन्ह्याचा तपास होता. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला तब्बल एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ही रक्कम ९५ हजार रुपये ठरली.
३० सप्टेंबर रोजी टाकळी हाजी पोलिस चौकी येथे एसीबीने सापळा रचला. पंचांसमक्ष ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाची चाहूल लागताच मुंढे यांनी लाचेची रक्कम हातात घेऊन अंधारात पलायन केले.
लाच स्वीकारल्याचा आरोप असलेला हवालदार एसीबीच्या हाती न लागता पसार झाल्याने या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे.
११ हजारांची लाच घेताना दुसरा हवालदार जेरबंद
याचदरम्यान शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४) यांच्यावरही एसीबीने कारवाई केली. तक्रारदार तसेच त्यांच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी आणि तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
तक्रारदाराकडून यापूर्वी रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर आणखी ११ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे एसीबीने नमूद केले आहे. ३० सप्टेंबर रोजी जुन्या शिरूर पोलिस ठाणे परिसरात सापळा रचून ११ हजार रुपये स्वीकारताना बनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दोन कारवाया… आता ‘मोठ्या माशां’कडे तपासाची नजर?
एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत, एकाच कालावधीत दोन हवालदारांविरुद्ध लाचखोरीच्या स्वतंत्र कारवाया झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लाच मागणारे आणि स्वीकारणारे कर्मचारी एवढेच दोषी आहेत की, या व्यवहारामागे आणखी कोणी आहे? पोलिस चौकीतील कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना याची कल्पना होती का? नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का? आणि चौकीत खरोखरच ‘लक्ष्मी’चा मुक्त संचार होता का? या प्रश्नांची उत्तरे आता एसीबीच्या तपासातून मिळणे अपेक्षित आहे.
‘पैशांशिवाय काम होत नाही’ या चर्चेची चौकशी होणार?
टाकळी हाजी पोलिस चौकीच्या कारभाराबाबत ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही’, अशा स्वरूपाच्या तक्रारी व चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
त्यामुळे केवळ दोन हवालदारांवर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी चौकीतील संपूर्ण कामकाज, तक्रारींचे स्वरूप आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका यांची स्वतंत्र चौकशी होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खाकीवरील विश्वास वाचविण्याचे आव्हान
पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास असतो. त्याच यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात एसीबीची कारवाई होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच लाचखोरीची मुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पुणे एसीबीकडून सुरू आहे.
दोन हवालदारांवर कारवाई झाली; आता तपासाची सुई कुठे वळते, याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष!