शिरूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो तरुणांनी रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिरूरचे माजी आमदार पोपटरावजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे यांनी केले होते.
रक्तदात्यांच्या सेवाभावाचा गौरव म्हणून प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट देण्यात आले. तसेच भाग्यवान रक्तदात्यांसाठी ठेवलेल्या सोडतीत अनिल भंडारी व विलास खोमणे हे प्रत्येकी एका सायकलीचे मानकरी ठरले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनीही शेवटपर्यंत विकासाचीच भूमिका जपली. या दोन्ही नेत्यांचे विचार समाजहित, विकास आणि जनसेवेची प्रेरणा देणारे असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.”
या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, सामाजिक बांधिलकी जपत युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.