गुन्हेपर्यटनपुणेपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

वारीत भक्तीबरोबर महिलांच्या सन्मानाची वाटचाल!

महिला उन्नती वारी २०२६' उपक्रमाचा पुण्यातील उरळीकांचन येथे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

विलासराव रोहीले
पुणे | आपले राज्य न्यूज
आषाढी वारी म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि संत विचारांचा महासागर. या पवित्र वारीत लाखो महिला वारकरीही विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत असतात. त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि सन्मानाची काळजी घेत राज्य शासनाने सुरू केलेला ‘महिला उन्नती वारी २०२६’ हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने उरळी कांचन येथे या विशेष उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी महिला वारकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबरोबरच आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. “वारी केवळ भक्तीची नाही, तर महिला सक्षमीकरणाचीही चळवळ बनली पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला.
वारी मार्गावर महिलांसाठी हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र, स्वच्छ शौचालये, सॅनिटरी पॅडची सुविधा, आरोग्य कक्ष आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच डिजिटल चित्ररथ, लोककला आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला हक्क, सुरक्षा, आरोग्य आणि स्वावलंबनाचा संदेश लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालणारा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी सांगितले की, पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिलांसाठीच्या विविध योजना, हेल्पलाईन आणि कायद्यांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसह महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहितीही या उपक्रमातून देण्यात येत असून, वारीतील प्रत्येक महिलेला सुरक्षितता, सन्मान आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भक्तीच्या या पवित्र प्रवासात महिलांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि सन्मानाची जबाबदारी समाजानेही उचलावी, हाच ‘महिला उन्नती वारी’चा खरा संदेश आहे.

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page