विलासराव रोहीले
पुणे | आपले राज्य न्यूज
आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची वाटचाल नाही, तर ती श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाचा अखंड महोत्सव आहे. उन्हात, पावसात आणि चिखलातून शेकडो किलोमीटर चालत जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना आता मायेचा स्पर्श मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला यंदाही वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावर सुमारे ४०० सेवा केंद्रांमधून तब्बल १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक अहोरात्र वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. वारकऱ्यांच्या पायांना औषधी आयुर्वेदिक तेलाने मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सेवा केंद्राला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधताना, “वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा आहे,” असे सांगत या सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम अधिक व्यापक करण्यात आला असून, ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम श्रद्धा आणि सेवेचा सुंदर संगम ठरत असून, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांच्या ओठांवरील “विठ्ठल… विठ्ठल…”चा गजर हीच या सेवाकार्यातील सर्वात मोठी पावती ठरत आहे.