पिंपरी, दि. १२ जुलै : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत ९ जणांचा बळी गेल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन अखेर अॅक्शन मोडमध्ये आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुर्घटनेची गंभीर दखल घेत पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
८ जुलै रोजी मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा प्रचंड ढिग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २३ जण अडकले होते. बचावकार्यात १४ जणांना बाहेर काढण्यात यश आले, मात्र ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन निष्काळजीपणाला कोणतीही माफी नसल्याचे स्पष्ट केले. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.