पर्यटनपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

मलठण ग्रामस्थांचे वृक्षलागवड व संवर्धनाप्रेरणा इतर गावांनी घ्यावी : गजानन पाटील

जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांचे ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

मलठण : शिंदेवाडी (मलठण), ता. शिरूर येथील उजाड गायरान जमिनीवर ग्रामस्थांनी एकत्रितपणे राबविलेली वृक्षलागवड व संवर्धनाची मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी आदर्शवत असून, या उपक्रमातून इतर गावांनीही प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.
शिंदेवाडी येथील सुमारे १५ एकर उजाड डोंगराळ गायरान क्षेत्रावर बँक ऑफ बडोदा आणि ‘गिव्ह मी ट्रीज’ संस्थेच्या सहकार्याने मियावाकी पद्धतीने तब्बल १ लाख २० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवड व संवर्धनाच्या कामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना गजानन पाटील म्हणाले, “पडीक व गायरान जमिनीचा पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास गावाचा परिसर हिरवागार होण्याबरोबरच भूजलपातळी वाढण्यास, मातीची धूप रोखण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. शिंदेवाडी ग्रामस्थांनी वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.”
जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे म्हणाले, “पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास अशा उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य आणि निधीची कमतरता पडू देणार नाही. वृक्षलागवड करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणेही गरजेचे आहे. शिंदेवाडीचा हा उपक्रम संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
या वृक्षलागवडीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली असून, पंचायत समितीच्या वित्त आयोगाच्या निधीतून शेततळे खोदण्यात आले आहे. वृक्षांना नियमित पाणी मिळावे यासाठी शिंदेवाडी येथील अनिल शिंदे यांनी स्वतःची दोन गुंठे जागा विहिरीसाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी डी. एल. थोरात, गटविकास अधिकारी महेश डोके, विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे, सरपंच माधुरी थोरात, उपसरपंच पोपट साळवे, मुकुंद नरवडे, दादा गावडे, विलास थोरात, नाना फुलसुंदर, किरण शिंदे, अनिल शिंदे, ग्रामसेविका राणी रासकर, संस्थेचे संतोष वाव्हळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page